करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण झाल्याने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम २०२०
-२१ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
*शासन निर्णयात म्हटले आहे की - 'शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड - १९ या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणेच्या संचालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी.'