मुंबईतील धारावी सारख्या ठिकाणी आपण शासनामार्फत प्लाझ्मा बँक सुरु करण्याचा निर्णय घेतला असून धारावी सारखीच पार्श्वभूमी कोरोना संसर्गाची मालेगांवात असू शकते, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात प्लाझ्मा डोनेशनसाठी बँक सुरु करण्याचा निर्णय विचाराधीन असून लवकरच आयसीएमआरच्या परवानग्या घेऊन ती सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यातील खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड आणि हॉस्पिटलच्या माहितीसाठी टेलीहेल्पलाईन तात्काळ सुरु करण्याच्या सूचना आज कोरोना विषयक आढावा बैठकीत सर्व संमतीने देण्यात आल्या आहेत.
आज नाशिक जिल्ह्यातील तसेच शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वसंमतीने घेतलेल्या निर्णयाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनास सुचना केल्या. या बैठकीस खासदार शरद पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मालेगांव महानगरपालिकच्या महापौर ताहिरा शेख आदी मान्यवर तसेच विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे डॉ.सुधाकर शिंदे उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या सर्वंकष निष्कर्ष आणि निर्णयाबाबत मार्गदर्शन करतांना आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले, जिल्ह्यातील कोविड रुग्णालय म्हणून सुरु असलेल्या खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले बेड, हॉस्पिटल्स यांची तंतोतंत व क्षणाक्षणाची माहिती जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही महापालिकेने हेल्पलाईन सुरु करावी. आरोग्य विभागातील सुमारे 17 हजार पदे तात्काळ भरण्यासाठी काही नियमांमध्ये शिथीलता आणण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या संदर्भात आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्रांना मान्यता मिळाल्यानंतर तेथील भरती करण्याचे अधिकार आरोग्य विभागाच्या विभागीय उपसंचालकांना असल्याने त्या संदर्भात तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच मालेगांव महानगरपालिकेला शासनाच्यावतीने निधी व सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यासाठी मालेगांव पॅटर्न ही जमेची बाब असून त्यातून बोध घेऊन अनेक उपाययोजना करता येऊ शकतात. पूर्वीच्या बैठकांमध्ये दिलेल्या बहुतांश सूचनांची पूर्तता करण्यात आल्याचे दिसत आहे. आता कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, ट्रॅकिंग वाढवून संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनांवर भर द्यावा. महापालिकेच्या लोकसंख्येच्या तुलनेत फिवर क्लिनिक 17 वरुन 75 वर आणण्यासाठी पालिका आयुक्तांनी प्रयत्न करावेत. जेवढे सर्वेक्षण तंतोतंत होईल तेवढे संकटही कमी होईल. जेथे जेथे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे तेथे तेथे संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय यशस्वी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेड व हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध असून त्यामुळे लॉकडाउन बाबत सध्या घाई करु नये, असे यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
डॉक्टर्सची उपलब्धता ही कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत राज्यभर उदभवलेली समस्या असून त्याला नाशिकही अपवाद नाही. खाजगी डॉक्टरांच्या सेवा तात्काळ अधिग्रहीत करण्यात याव्यात तसेच त्यांच्या याद्याही जाहिर करण्यात याव्यात. प्रत्येक डॉक्टरची सेवा 7 दिवसांसाठी घेण्यात याव्यात. सेवा न देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची शिफारस करण्यात यावी. प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक रुग्णालयात लेखापरिक्षकांची नियुक्ती करुन त्यांनी बिल तपासल्यानंतरच व ते योग्य असल्याचे आढळून आल्यावरच रुग्णाला बील रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
महात्मा फुले आरोग्य विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. 100 टक्के गरीब लोकांना कोविड कालखंडात या योजनेचा उपयोग व्हायला हवा. खाजगी रुग्णवाहिका अधिग्रहीत करुन त्या कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास जोडल्यास तक्रारींचे प्रमाण कमी होईल. ज्या खाजगी रुग्णांलयांमध्ये गरीब रुग्णांसाठी सवलतीच्या दराने बेड आरक्षित करण्यात आले आहेत त्याचा लाभ खरोखर गरीब रुग्णांसाठी होईल त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. कोरोना कालखंडात करावयाच्या सर्व उपाययोजनांचा निधी हा जिल्हास्तरावर वर्ग करण्यात आला आहे. त्या निधितून औषधे व इंजेक्शन खरेदी करता येतील व या इंजेक्शनचा फायदा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांसाठी करण्याचे नियोजन करावे. येत्या दोन दिवसात पुरेशा प्रमाणात इंजेक्शनचा साठा जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. कोरोना संसर्गात केवळ आर्थिक परिस्थितीमुळे गरीब नागरिक उपचारापासून वंचित राहणार नाहीत याचीही काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे यावेळी आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढविणे हे कोरोना संसर्गाच्या नियंत्रणातील मोठी साखळी असून लोकप्रतिनिधींच्या सहभागाचं यशस्वी उदाहरण मालेगांवच्या रुपाने जगासमोर आले आहे. तसाच लोकप्रतिनिधींचा सहभाग सर्वत्र वाढविण्यावर भर द्यावा. सर्व प्रशासकीय यंत्रण मिशन मोडवर काम करीत असल्याने मालेगांव पॅटर्नची चर्चा होते आहे. राज्यात सुमारे 2 लाख लोक आजपर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत त्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी व लोकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी प्रयत्न यापुढील काळात करावे लागणार असल्याचे श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले.
परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे जात राहु : पालकमंत्री श्री.भुजबळ
सुरुवातीला राज्यात इतर महानगरांमध्ये कोरोना संसर्गितांची संख्या वाढत होती त्यावेळी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नव्हता. परंतू पहिले लॉकडाउन संपल्यानंतर संसर्गितांची संख्या कमालीची वाढली. सुरुवातीला सुरु झालेला अनभिज्ञतेचा प्रवास अनुभवाअंती योग्य दिशेने जातांना दिसतो आहे. त्यातूनच आपण मालेगांवची लढाई जिंकली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण रुग्ण बरे करण्याबरोबरच त्यांचा मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे लक्ष शासनाने निश्चित केले आहे. संपूर्ण लॉकडाउन झाले त्या जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे दिसून आलेले नाही. अशा प्रकारच्या अनुभवातून परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण पुढे जात राहू आणि कोरोनावर मात करु असा आशावाद पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त करुन जिल्ह्यात खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विनंतीवरुन आढावा घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
मालेगांवचे यश हे केवळ टिम वर्कमुळे : दादाजी भुसे
मालेगांवचे यश आज जगासमोर पॅटर्न म्हणून येतांना दिसत असले तरी त्यात जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, धार्मिक नेते व लोकप्रतिनिधी सर्वांचाच सहभाग आहे. सर्वांनी एकजुटीने केलेल्या कामाचे फलित म्हणजे आज मालेगांवची कमी झालेली रुग्णसंख्या आहे. जनतेच्या मनातील भिती दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी लागणार आहे. मालेगांवच्या यशाने हुरळून न जाता सावध पावले उचलण्याची गरज आहे. शुन्यावर लोकसंख्या येईपर्यंत एकजुटीने टिमवर्क म्हणून काम करावे लागणार आहे. प्रत्येक गल्ली आणि वस्त्यांमध्ये छोट्या प्रमाणावर क्लिनिक चालविणाऱ्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवरच उपचार कसे करता येतील त्यासाठी भविष्यात जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे. छोट्या डॉक्टरांना दिलेले बळ व त्यातून निर्माण झालेली सुस्थिती आज आपण मालेगांवात पाहत आहोत. त्याचबरोबर नॉन कोविड पेशंटचे हाल होणार नाहीत त्यासाठीचेही नियोजन व व्यवस्था करणे गरजेचे आहे असे यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
वस्तुस्थितीचा आढावा घेऊन केंद्र व राज्यसरकारशी बोलणार : शरद पवार
मी मुद्दाम जाणीवपूर्वक या आढावा बैठकीस उपस्थित राहिलो. कोरोनाचा प्रश्न संपूर्ण जगाला भेडसावतो आहे. त्याची तीव्रता आपणही अनुभवतो आहोत. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती नक्कीच चांगली आहे. संबध देशात महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात परिस्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नाशिक या शहरांमध्ये परिस्थिती विचार करण्यासारखी आहे. या जिल्ह्यांमध्ये व शहरांमध्ये जाणीवपूर्वक सर्व वस्तुस्थिती पडताळून आणि उणिवांचा आढावा घेऊन त्यातील कमतरता तपासून जे प्रश्न केंद्राच्या पातळीवर सोडविण्यासारखे आहेत त्या प्रश्नांसाठी आपण केंद्राशी बोलणार आहोत. तसेच राज्यशासनामार्फत जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत राज्य शासनाशी बोलुन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आपण देणार आहोत. संख्या वाढते आहे ही वस्तुस्थिती आहे जेवढया टेस्ट वाढतील तेवढी संख्याही वाढेल. आज उपलब्ध असलेले रिक्त बेड, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर्स यांची उपलब्धता पाहता त्यांचा उपयोग करण्याची गरज आहे असे यावेळी खासदार शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना खासदार श्री.पवार म्हणाले, नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असुन कोविड संसर्गाच्या काळात या विद्यापीठाचीही सक्रीयता वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी नाशिक, धुळे, जळगांव या तिन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन झाली. त्यावेळी नाशिक जिल्ह्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ देण्यात आले व धुळे जळगांव जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ दिले. आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी इथल्या जनेतेचे मोठे योगदान असून कोरोना काळात या विद्यापीठाचा व तेथील डॉक्टर्स, संशोधक, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग हा या निमित्ताने दिसून यायला हवा. विविध घटकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद जर मिळत नसेल तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आवश्यकतेनुसार वापर प्रशासनाने करावा असेही यावेळी श्री.पवार यांनी सांगितले. मालेगाव येथील परिस्थितीमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी संकटाच्या काळामध्ये एकजुटीने काम करण्याची गौरवशाली परंपरा कायम राखली याबाबत श्री पवार यांनी सर्वांचे कौतुक केले. यावेळी खासदार शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात गरीब रुग्णांना देण्यासाठी इंजेक्शनचा संच त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केला. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहेर, आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, रंजन ठाकरे यांनी सहभाग घेतला. व लोकप्रतिनिधींनी यावेळी उपस्थित केलेल्या स्वॅब टेस्टिंग, अनुदान, बेड, पेशंटच्या समस्या व हॉस्पिटल व्यवस्थापन या संदर्भातल्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी महापालिका आयुक्त व जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.
बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे डॉ.सुधाकर शिंदे, जिल्हा पोलीस अधिक्षक आरती सिंह व मालेगांवसाठी नियुक्त विशेष समन्वय अधिकारी सुनिल कडासने यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील सादरीकरण केले. तसेच आभार प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी लीन बनसोड यांनी केले.