YouTube Video Carousel

प्रतिबंधित क्षेत्रांवर लक्ष नियंत्रित करावे :अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम

मालेगाव, दि. 09 (मालेगाव लाइव वृत्तसेवा) : मालेगाव शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाला बऱ्यापैकी यश मिळतांना दिसत असले तरी, यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी गाफील न राहता शहरासह ग्रामीण भागातील प्रतिबंधीत क्षेत्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी आज दिल्या.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, सहायक आयुक्त राहूल मर्ढेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना ठाकरे, डॉ.गोविंद चौधरी, डॉ.लोथे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी श्री.निकम म्हणाले, सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कोरोना विषाणू प्रसारावर काही अंशी अटकाव करण्यात यश आले आहे. आता प्रतिबंधीत क्षेत्र वगळता इतर भागात नागरिकांचा संचार बऱ्यापैकी वाढला असला तरी, प्रतिबंधीत क्षेत्रातून नागरिकांचा संचार होणार नाही, प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा सुविधा वेळेवर पुरवाव्यात. फिवर क्लिनीकच्या माध्यमातून कोरोना संशयीत रुग्णांवर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. खाजगी रुग्णालयातील ओपीडीसह आयपीडी नियमीतपणे कार्यान्वित राहण्यासाठी संनियंत्रण करावे. कोवीड डॅशबोर्ड व कोवीड पोर्टल नियमीतपणे अपडेट करावे अशा प्रकारच्या सुचनाही श्री.निकम यांनी यावेळी दिल्या. तर पावसाळ्यापुर्वी साथरोगांचे नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ राबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ॲक्टीव्ह रुग्णांना मिळणार सर्वेलन्स आयडी : प्रातांधिकारी विजयानंद शर्मा


कोरोना तपासणी अहवालांना आता बऱ्यापैकी गती मिळाली असून काल पाठविलेले केवळ 46 तपासणींचा अहवाल प्रलंबीत असल्याचे सांगत प्रातांधिकारी विजयानंद शर्मा म्हणाले, आता रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांना एक सर्वेलन्स आयडी मिळणार असून त्यामुळे रुग्णाची सद्यस्थिती व प्रगती अहवाल तात्काळ मिळणार आहे. खाजगी डॉक्टरांमार्फत रुग्ण तपासणीसाठी एसओपी ठरविण्यासाठी सर्व डॉक्टरांची लवकरच बैठक आयोजित करून एक दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही श्री.शर्मा यांनी सांगितले. तसेच उपलब्ध ऑक्सिजन सिलींडर, औषधसाठा, सुरक्षासाहित्यांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.
Previous Post Next Post