मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणार्या शासकीय, खासगी, कंत्राटी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचार्यांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणार्या संबंधित कर्मचार्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचे सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबदार्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहे. या कर्मचार्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत राज्य शासन गंभीर असून, त्यादृष्टीने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आला आहे.
आरोग्य सेवेच्या कर्मचार्यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे.आजच्या शासन निर्णयानुसार, कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी अशा सर्वं घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
साभार : दै. केसरी
