YouTube Video Carousel

राज्यातील लॉकडाउन शिथिल होणार नाही; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन, सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई, दि ३ :राज्यातील निर्बंधांबद्दल पाच टप्प्यात लॉकडाऊन उठवण्यात येणार असल्याच्या निर्णयावरून राज्य सरकारने अर्ध्या तासात यु टर्न घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग अद्याप थोपविलेला नाही. ग्रामीण भागातील संसर्गाबद्दल चिंता कायम असल्याने हा निर्णय घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या संदर्भात संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. या विषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल असे राज्य शासनाने सांगितले आहे

कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे, या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.


Previous Post Next Post