YouTube Video Carousel

‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे उत्पादन आता भारतातही सुरू

मालेगाव (तरूण भारत )कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रशियाकडून तयार करण्यात आलेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीचे उत्पादन आता भारतातही सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. भारतात ‘पॅनासिया बायोटेक’ने ‘स्पुटनिक-व्ही’चे उत्पादन सुरु केले. ’रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड’च्या (आरडीआयएफ) मदतीने हे उत्पादन सुरु करण्यात आल्याची माहिती आहे. ‘पॅनासिया बायोटेक’ ही कंपनी ‘स्पुटनिक-व्ही’चे वर्षाला दहा कोटी डोस तयार करणार आहे.

 ‘आरडीआयएफ’ आणि ‘पॅनासिया बायोटेक’कडून लसनिर्मितीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी करार करण्यात आला होता. त्या करारानुसार लसनिर्मिती सुरु झाली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. ‘पॅनासिया बायोटेक’ कंपनीने हिमाचल प्रदेशातील आपल्या कारखान्यात ‘स्पुटनिक-व्ही’ लसीची निर्मिती सुरू केली आहे. या कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लसींची पहिली मात्रा रशियाच्या केंद्रात पाठवली जाणार आहे. तिथे या लसीची गुणवत्ता तपासली जाणार आहे.

‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’नंतर भारतात ’स्पुटनिक-व्ही’ लसीला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना लसींचा तुटवडा पाहता ‘स्पुटनिक-व्ही’ लसीला परवानगी देण्यात आली होती. केंद्र सरकारने दि. १२ एप्रिल रोजी या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर दि. १४ मेपासून या लसीचा डोस दिला जात आहे.




Previous Post Next Post