मालेगाव (मालेगाव लाइव वृत्तसेवा ) महाराष्ट्रात करोना च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना दिवसेंदिवस वाढणाऱ्या मृत्यूचा तांडवामुळे आप्तस्वकीयांच्या मृत्युच्या बातम्या हृदय पिळवटून टाकत आहेत, नाशिक जिल्यात गेल्या पंधरवाड्यात सुमारे २५-३० मृत्यू रोज केवळ करोना मुळे होत असल्याची अत्यंत गंभीर आणि मन हेलावणारी आकडेवारी समोर येत आहे , आणि अशातच एकाच कुटुंबातील व्यक्ती २-३ व्यक्ती एकाच वेळी निघून जाणे नक्कीच सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.
कोरोना संसर्गावर यशस्वी मात करून घरी परतलेल्या देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील पांडुरंग विठ्ठल आहिरे (७२) यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नी किसनाबाई (६६) यांचे निधन झाले. पती व पत्नीचा काही तासांच्या अंतरावर मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. देवळा तालुक्यातील पिंपळगाव (वा) येथील पांडुरंग आहिरे व त्यांचा पत्नी किसनाबाई आहिरे यांनी दि.२४ मार्च रोजी सटाणा येथील खासगी रूग्णालयात कोरोना चाचणी केली होती. दि.२७ मार्च रोजी पती-पत्नीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आहिरे दांपत्याने सटाणा येथे खासगी रुग्णालयात उपचार घेतला. दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने दि.२८ मार्च रोजी त्यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. नाशिक येथील खासगी रुग्णालयात कोरोनावर यशस्वी मात करून हे दांपत्य दि.४ एप्रिल रोजी आपल्या घरी परतले होते. मात्र दि.७ एप्रिल रोजी रात्री काळाने घाला घातल्याने या अहिरे दाम्पत्याचा एकामागोमाग मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या घटनेत गेल्या चार-पाच दिवसांतच गुंजाळनगर ता.देवळा येथील एकाच कुटुंबातील बाप व दोन लेकांचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुंजाळनगर येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर दगा गुंजाळ यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर नासिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्यांचे वडील दगा शामभाऊ गुंजाळ यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांच्यावर उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे त्यातच निधन झाले. दोन कर्त्या कुटुंबातील व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवीत असतानाच नासिक येथे वास्तव्यास असलेल्या भाऊसाहेब दगा गुंजाळ यांनाही कोरोनाने घेरल्याने त्यांच्यावर नासिक येथे उपचार सुरू होते. त्यांचेही तेथेच निधन झाल्याने येथे हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच कुटुंबातील तीन कर्त्या व्यक्तीना कोरोनाने विळखा घालून गिळंकृत केल्याने संपूर्ण देवळा तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत असताना व प्रत्येक गावात कोरोनामूळे मृत्यू होत असतानाही नागरिक बेफिकीर वागत आहेत. दगा शामभाऊ गुंजाळ हे माजी उपसरपंच सतीश गुंजाळ यांचे चुलते होत.
