*मालेगाव, दि. 24 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा)* : 114 मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील काही मतदारांचे एका पेक्षा अधिक ठिकाणी नावे असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील मतदार यादी शुध्दीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आल्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे.
114-मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघातील ज्या मतदारांचे नाव एकापेक्षा अधिक यादी भागात समाविष्ट आहेत अशा मतदारांनी एकाच यादीभागात आपले नाव राहील यासाठी फॉर्म नं.7 भरून आवश्यक ती दुरूस्ती करावी. त्याच बरोबर स्थलांतरित अथवा मयत मतदारांची नावे देखील मतदार यादीतून वगळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.शर्मा यांनी केले आहे.
मतदार यादी शुध्दीकरणाची विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून बीएलओ मार्फत या सर्व याद्यांचे पुर्नसर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात ज्या मतदारांचे नाव एकापेक्षा अधिक भागात आढळून येईल अशा मतदारांबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
फॉर्म नं. 7 हे आपल्या भागातील बीएलओ यांच्यासह तहसिल कार्यालयातील निवडणुक शाखेत उपलब्ध आहेत. तरी ज्या मतदारांचे नाव एकापेक्षा अधिक यादी भागात समाविष्ट आहेत अशा मतदारांनी स्वत:हून पुढे यावे व आवश्यक ती दुरूस्ती करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन श्री.शर्मा यांनी केले आहे.