*नाशिक, दि. ३ जुलै २०२० (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) :*
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरुन नियमितपणे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, प्रदुषण नियंत्रण मंडळ व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रनिहाय नेमणूक करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, क्षेत्रनिहाय नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांमना कोरोना आजाराचा प्रसार नियंत्रित करणे, मृत्युचे विश्लेषण, पॅथोलॉली लॅब संदर्भातील व्यवस्थापन, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे व्यवस्थापन आदी कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभागाने कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी व मृत्युंचे विश्लेषण करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना सोपविण्यात आली आहे. तसेच नाशिक व मालेगांव महानगरपालिका क्षेत्र वगळून संपूर्ण जिल्ह्यातील समन्वय व संनियंत्रण करावे. मृत्युंचे विश्लेषण करण्याचे काम डॉ. उदय बर्वे यांनी डॉ. जगदाळे यांच्या देखरेखीखाली पार पाडावे, असे निर्गमित केलेल्या आदेशात श्री. मांढरे यांनी सांगितले आहे.
कोरोना संशयित रुग्णांच्या नमुने तपासणीस होणारा विलंब टाळण्यासाठी आणि सर्व पॅथोलॉजी लॅब पुर्ण क्षमतेने सुरु राहण्यासाठी आवश्यक व्यवस्थापन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या योजनेचे समन्वयक डॉ. तुषार मोरे व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितांना निगराणीखाली ठेवून उपचारासाठी निश्चित करण्यात आलेल्या दवाखान्यात दाखल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे व संबंधित गट विकास अधिकारी यांचा सोपविण्यात आली आहे.
प्रभावी सर्वेक्षण, विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाची निगराणी आणि अतिसंवेदनशील रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अरविंद अंतुर्लीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कोरोना संक्रमीत रुग्णांचे प्रमाण वाढले तर उपचार केंद्र उभारणीचे काम आणि मान्सून कालावधीत उपचार केंद्राचे दुरुस्ती व देखभालीचे काम तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता तांबे यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणाच्या अनुषंगाने उपचाराकरिता विहित केलेल्या त्रिस्तरीय पद्धतीतील रुग्णालयांना आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आलेली असून ते संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील (नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्र वगळून) समन्वय आणि संनियंत्रण करतील.
नाशिक जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन बाबत समन्वय आणि संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथील प्रादेशिक अधिकारी यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे, तसेच नाशिक ग्रामीणमधील जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन, समन्वय आणि संनियंत्रण करण्यासाठी संबंधित गट विकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केलेल्या कामांची माहिती अचूकपणे पोर्टलवर माहिती अपडेट करणेसाठी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. कैलास भोये, सिटी प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. शैलेश लोंढे, सिटी क्वालिटी अशुरन्स क्वार्डिनेटर डॉ. पंकज शिंपी, डिस्ट्रिक्ट क्वालिटी अशुरन्स क्वार्डिनेटर डॉ. सायली ठोकळ हे समन्वय आणि संनियंत्रण करतील.
मनपा क्षेत्र वगळून खाजगी रुग्णालय तपासणी व संनियंत्रित करण्यासाठी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आलेली असून ते संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील (नाशिक व मालेगाव महापालिका क्षेत्र वगळून) समन्वय आणि संनियंत्रण करतील. तसेच संबंधित तालुका व उपविभागांकरिता सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व कोषागार अधिकारी, उपलेखापाल यांचेवर जबाबदारी देण्यात आलेली आहे.
वरील अधिकाऱ्यांची नियुक्ती नाशिक ग्रामीण जिल्ह्यासाठी करण्यात आलेली असून जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्रांसाठी मनपा आयुक्त यांचे स्तरावरून स्वतंत्ररीत्या आदेश काढण्यात येणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडावी व केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल आपत्ती संनियंत्रण कक्ष कडे सादर करावा असे निर्देश देखील श्री मांढरे यांनी दिले आहेत. या सर्व कामाचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकारी स्तरावरून घेतला जाणार असून त्यामुळे सर्व उपाययोजनांचे क्षेत्रीय स्तरावरील अंमलबजावणीला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
०००