YouTube Video Carousel

कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यकअधिक्षक सुनिल कडासने

मालेगाव, ( दि. 04 मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा ): कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करतांना प्रभावीत झालेल्या नागरिकांमध्ये कोरोना बद्दल अजुनही मोठ्या प्रमाणात समज गैरसमज आहेत. 'निसर्ग' सारख्या चक्रीवादळामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. एकामागे एक संकटांचा सामना करतांना नागरिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती आवश्यक असल्याचे लाचलुचपत विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयक सुनिल कडासने आज म्हणाले.

अपर जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती पत्रक वितरणाच्या कार्यक्रमात लाचलुचपत विभागाचे अधिक्षक तथा कोरोना समन्वयक श्री.कडासने बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, सामान्य रुग्णालयाचे डॉ.हितेश महाले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.अझहर, सेवाभावी संस्थांचे प्रमुख, सामाजिक कार्यकरर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.कडासने म्हणाले, कोरोना विषाणूबद्दल सर्व समाजांमध्ये जनजागृती होवून कोरोना सारख्या महामारीला रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांबाबत माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. महानगरपालिकेमार्फत  मराठी व ऊर्दू भाषेत ही माहितीपत्रके तयार करण्यात आली आहेत. आजपासून शहरातील पुर्व भागातील अक्सा कॉलनी, रमजानपुरा भागातील प्रत्येक घराघरांमध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे, तर पश्चिम भागातील संगमेश्वर, कॅम्प परिसरामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शहरातील प्रभावीत भागांमध्ये कॉर्नर बैठका घेवून जनजागृती करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी सामान्य रुग्णालयाचे डॉ. हितेश महाले म्हणाले की, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आदि लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करुन योग्य उपचार वेळेवर करुन घ्यावा. वयोवृध्दांसह दिर्घ आजार असणाऱ्या नागरिकांसाठी करोना विषाणू घातक ठरत आहे. शहरामध्ये क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या आजाराने पिडीत रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. नागरिकांनी नियमीतपणे मास्क वापरणे आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे, आरोग्य प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Previous Post Next Post