चंद्रपूर : येथील ३ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जोडप्यातील पत्नीने आत्महत्या केल्यानंतर, नवऱ्यानेही बायकोच्या चितेवर उडी घेऊन आयुष्य संपवल्याची थरारक घटना चंद्रपूर येथे घडली पतीने पत्नीच्या जळत असलेल्या चितेत उडी घेतल्याने जबर जखमी झाला होता, लोकांनी त्याला कसबसं बाहेर काढले, पण तरीही तो लोकांची नजर चुकवून जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून स्वतचा अंत करून घेतला, धक्कादायक म्हणजे या दाम्पत्याचं लग्न फक्त 3 महिन्यांपूर्वीच झालं होतं.
चंद्रपूरच्या गोंडपीपरी तालुक्यातील भंगाराम-तळोधी गावातील घटनेने जनमानस हादरले आहे. गर्भवती विवाहितेची आत्महत्या आणि पाठोपाठ पतीच्या आयुष्याचा शेवट यामागे नक्की कारण काय हे मात्र गूढ आहे.
या किशोर खाटीक असं या पतीचं नाव आहे. त्याचा विवाह भंगाराम-तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिच्याशी नुकताच 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. दरम्यान, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम-तळोधी इथं माहेरी आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास ती घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिनं गावलागतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिता पेटली आणि या पेटत्या चितेवर किशोरनं उडी घेतली. रुचितानं आत्महत्या का केली, हा तपासाचा विषय असतानाच तिच्या पतीनंही असं टोकाचं पाऊल उचलून कुटुंबीयांना जबर धक्का दिला. या नवदाम्पत्याच्या अकाली आणि अनपेक्षित आत्महत्यांमुळं लोकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा तपास गोंडपिंपरी पोलीस करीत आहेत.

