YouTube Video Carousel

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाचखोर पोलीस नाईकांना रंगेहाथ पकडले.

नाशिक, दि. १३ डिसेंबर २०२३ -

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महामार्ग पोलीस केंद्र घोटी येथे तैनात असलेल्या दोन पोलीस नाईकांना लाचेच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपींवर १५ हजार रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे.

पुणे येथील ट्रकचालक हा मुंबईहून इगतपुरीकडे जाण्यासाठी जात होता. त्यावेळी महामार्ग पोलीस केंद्र घोटी येथे त्याला थांबवण्यात आले. पोलीस नाईक कैलास रामदास गोरे आणि संतोष उत्तम माळोदे यांनी त्याला कसारा घाटातुन इगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देवुन सदरील घाट ओलांडुन / पार करुन देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागणी केली.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सापळ्यात सापडलेल्या दोन पोलीस नाईकांनी १५ हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी दोन्ही पोलीस नाईकांवर इगतपुरी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ सह भ्रष्टाचार प्रतिबंध (संशोधन) अधिनियम २०१८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक संदिप घुगे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल, पोलीस हवालदार अनिल राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन नेटारे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क करावा.

Previous Post Next Post