YouTube Video Carousel

हुल्लडबाजी करणाऱ्यांनो सावधान! नववर्षानिमित्त मालेगावात चोख पोलीस बंदोबस्त

मालेगाव,- दिनांक ३१ डिसेंबर रोजी नववर्षानिमित्त मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होणार आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव ग्रामीण पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मालेगाव शहरात ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, ३० दुय्यम अधिकारी, २२५ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. तसेच, महत्वाच्या ठिकाणी २ आरसीपी प्लाटून, एसआरपी प्लाटून, होमगार्ड आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी शहर वाहतुक शाखा मालेगावचा समावेश असलेल्या चोख पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.

पोलीसातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात येणार आहे. त्या प्रमाणे वाहतुक नियमांचे उल्लंघन व ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

मद्य पिवून वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणा-या आस्थापना, अंमली पदार्थ विक्री/सेवन यासारखे बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
 नागरिकांनी पोलीस मदतीसाठी ११२ या कमांकावर संपर्क साधावा.
प्रातिनिधिक फोटो
Previous Post Next Post