YouTube Video Carousel

व्यापाऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम - आठ तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास नऊ तारखेला स्वतः दुकाने उघडणार



नाशिक, ता. ६ : राज्य सरकारने ब्रेक द चेनचा निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता दुकाने सरसकट बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने यामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, व्यापार्यांचे या निर्णयामुळे मोठे नुकसान होत आहे. ८ एप्रिलपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ एप्रिलपासून व्यापार सुरू करणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला.
राज्य सरकारने सोमवारपासून ब्रेक द चेन अंतर्गत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेताना तातडीने अंमलबजावणी देखील सुरू केली. निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते; परंतु तसे न करता एकतर्फी निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड ऑग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील व्यापाऱ्यांची ऑनलाइन मीटिंग झाली. मीटिंगमध्ये सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला. राज्य सरकारचे व्यापाराला आळा घालणारे धोरण आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांच्या विरोधात असा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे. अतिशय कमी वेळेत निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ८ एप्रिलपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे 'ब्रेक द चेन'चा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर निर्णय न झाल्यास ९ एप्रिलपासून दुकाने उघडली जाणार असल्याचे मंडलेचा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अॅन् इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय शेटे, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री अॅन्ड अॅप्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, चेंबर ऑफ मराठवाडा, इंडस्ट्रीज अॅन्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष कमलेश धूत, पुना मर्चन्टस चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, चेंबर ऑफ असोसिएशनस ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅन्ड ट्रेडचे अध्यक्ष दान अग्रवाल, कॅटचे राज्य चेअरमन राजेंद्र बांठिया, हर्षवर्धन संघवी (चंद्रपूर), अश्विन मेदांडिया (नागपूर), रामजीवन परमार (गोंदिया), जगन्नाथ काळे (औरंगाबाद), संतोषकुमार लोढा, योगेश सोनवणे, मोहन गुरुनानी, सुरेश चावला, विक्रम दोशी, कॅटचे दिलीप कुंभोजकर, राज्यातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी ब्रेक द चेन विषयावर मते मांडताना विरोध केल्याची माहिती श्री. मंडलेचा यांनी दिली. मीटिंगमध्ये राज्यातील तीनशेहून अधिक व्यापारी सहभागी झाले होते (साभार  दै. सकाळ )
Previous Post Next Post