: अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम*
मालेगांव, दि. 8 (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी, नाशिक यांनी पारित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कोविड-19 ची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिम राबवितांना जमाव बंदीसह संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक धनंजय निकम यांनी आज दिल्या.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘ब्रेक द चेन’ मोहिमेच्या अनुषंगाने पारित करण्यात आलेल्या आदेशातील संभ्रम दुर करून निर्देशीत केलेल्या सुचनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री.निकम बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, महानगर पालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, पोलीस उपअधिक्षक प्रदिप जाधव, लता दोंदे, तहसिलदार चंद्रजित राजपूत यांच्यासह शहर व ग्रामीणचे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी व महानगरपालिकेचे चारही प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अपर जिल्हाधिकारी श्री.निकम म्हणाले, कोविड-19 या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने व जिल्हाधिकारी, नाशिक यांनी ज्या सुचना केल्या आहेत त्यांची प्रभावी अमंलबजावणी 5 एप्रिल पासून काटेकोरपणे सुरू झाल्याचे सांगतांना अपर जिल्हाधिकारी श्री.निकम म्हणाले, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी व रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या जमावबंदी मध्ये पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाही करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास यावेळी दिले. तर शनिवार व रविवार हे दोन दिवस पूर्णपणे संचारबंदी लागू राहील असेही ते यावेळी म्हणाले.
जमावबंदी काळात म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जिवनावश्यक वस्तूसांठी दवाखाने, मेडीकल, तपासणी लॅब, किराणा दुकान, डेअरी, बेकरी, केक शॉप, वाहन दुरुस्तीची दुकाने, स्पेअर पार्टची दुकाने, मटन, चिकन, मासे विक्रीची दुकाने सुरु असतील. तसेच मद्य विक्रीची दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली असून बार व रेस्टारंट या सारख्या हॉटेलातून मद्याची व जेवणाची पार्सल सुविधा उपलब्ध होऊ शकतील किंवा होम डिलेव्हरी करण्याची जबाबदारी ही त्या बार मालकाची असेल.
वरील सर्व सेवा देणाऱ्या आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांना कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरातील सिनेमागृह, खेळाची मैदाने, सलून व्यवसाय, पार्लर, स्पा, शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, हे पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले आहे. केवळ धार्मिक स्थळांची दैनंदिन पूजा अर्चा करिता संबंधित धर्मगुरूंना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सफाई कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवा बजावतील व शासकीय कर्मचारी हे 50 टक्के क्षमतेने आपले कर्तव्य बजावतील.
शहरासह तालुक्यात ट्रान्सपोर्ट व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु असेल, शहरातील रिक्षा अथवा टॅक्सी व्यवसाय धारकांनी निर्धारित व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना बसविण्यास मज्जाव करण्यात आला असून संबंधित रिक्षा, टॅक्सी चालकांनी कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचा अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. लग्नसमारंभासाठी दोन्ही बाजुचे 50 लोकांची उपस्थित असावी. तसेच अंत्यविधीसाठी किमान 20 लोकांना परवागनी असेल परंतू प्रत्येकाने मास्कसह कोरोनाची लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याचा अहवाल स्वत:जवळ असणे गरजेचे आहे. जमावबंदी व संचारबंदी काळात मान्यताप्राप्त माध्यमप्रतिनीधींनी आपले ओळखपत्र सोबत बाळगावे असेही श्री. निकम यांनी सांगितले. त्याच बरोबर 45 वर्षावरील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.निकम यांनी यावेळी केले आहे.
अपर पोलीस अधिक्षक चंद्रकात खांडवी यांनी कर्मचाऱ्यांना शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतेवेळी आपल्यासह इतर कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. ग्रामिण भागात कर्तव्य बजावतांना काही अडचणी आल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामसेवक यांनी पोलीस प्रशासनास मदत करण्याचे आवाहनही श्री.खांडवी यांनी केले.
*000000*