YouTube Video Carousel

रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना होण्यासाठी व्यवस्था करावी : जिल्हाधिकारी

नाशिक : दि २५ सप्टेंबर २०२० (मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा) 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यामधील कोविड - 19 चे रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा सर्वसामान्य गरजू रुग्णांना वेळेवर होणेसाठी आदेश आज देण्यात आले आहेत. याच धर्तीवर मालेगाव कार्य क्षेत्रासाठी यथोचित व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगांवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक धनंजय निकम यांना दिले आहेत.

रेम्डीसिवीर या औषधाचा कोरोना रुग्णासाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असून त्या अनुषंगाने सदर औषधांचा पुरवठा रुग्णांना वेळेवर होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे व त्यामुळे या औषधाच्या विक्री व विनियोग याचे योग्य समन्वय व सनियंत्रण होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. सद्यस्थितीत या औषधाची विक्री अनेक विविध ठिकाणांवरून होत असल्यामुळे त्यावर प्रभावी संनियंत्रण राखणे जिकिरीचे होत असल्याची बाबही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या आदेशात निदर्शनास आणली आहे. 

मालेगाव येथील आपत्कालीन कार्य केंद्रासाठी घटना व्यवस्थापक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय  निकम यांची नियुक्ती या पूर्वीच केलेली आहे. त्या अनुषंगाने औषधाची विक्री करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन संबंधित विक्रीच्या ठिकाणावरून होत आहे किंवा नाही, गरजू रुग्ण यांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते किंवा कसे, उपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केली जाईल याबाबत खात्री करणे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यकते नुसार घटना व्यवस्थापक म्हणून आपले स्तरावर नियंत्रक अधिकारी, पथके नेमणूक करणे, सनियंत्रण करणे ई.साठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, असेही श्री. मांढरे यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे.
Previous Post Next Post