ये तो है सर्दी में धूप की किरणें
उतरें जो आँगन को सुनहरा सा करने...
कोरोना योद्ध्यांना नाशिकच्या चिमुकल्यांनी हजारो शुभेच्छापत्र पाठवून केला सृजनशील सलाम;
सर्व योद्ध्यांच्या वतीने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केला शुभेच्छापत्रांचा स्वीकार
नाशिक, दि. 13 जून 2020 (जय योगेश पगारे ) :
एखाद्या आकलना पलिकडच्या शक्तीशी लढण्यासाठी आत्मबल आणि समाजाचे पाठबळ खूप मोलाचे ठरते. कोरोना लढ्यातही तेच कामी आले आणि आज जिल्ह्यातील चित्र पालटत आहे. या कोरोनाचा जसा मोठ्यांच्या मनावर परिणाम झाला तसाच चिमुकल्यांच्या मनावर झाला. मात्र सृजनशीलतेची उमगस्थाने असलेली ही कोवळी मुलं जर हिरमुसली तर भविष्यातील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ कसे मिळणार? त्यामुळे कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यातील कल्पकतेला अनलॉक करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी एका कला शिक्षिकेने त्यांनासोबत घेत एक आभारपर्व सुरू केले. त्यामुळे घराघरातील मुलांच्या विविध कल्पनांना नवनिर्मितीची पालवी तर फुटलीच याशिवाय कोरोनायोद्धांनाही लढण्यासाठी बळ मिळाले. ही कल्पना होती आभारपत्रांची व शुभेच्छा पत्रांची ! विशेष म्हणजे चिमुकल्यांनी तयार केलेली ही डिजिटल शुभेच्छापत्र जेव्हा मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पोहोचताहेत ते देखील भारावून जात आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रातिनिधीक स्वरुपात ही आभारपत्र स्वीकारून या नवकल्पनेचे स्वागत केले आहे.
कोरोनासारख्या आकलना पलिकडच्या शक्तीशी लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. जीवाची बाजी लावणाऱ्या योद्ध्यांना आज सारा समाज सॅल्यूट करीत आहे. अशावेळी आपणही या योद्ध्यांच्या कार्याला सलाम करावा, असे कला शिक्षिका दर्शना राजपूत यांना वाटले. त्यासाठी त्यांनी लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मुलांच्या लॉक होणाऱ्या सृजनशिलतेला अनलॉक करत पुरेपर वापर करून घेतला. या उपक्रमांतर्गत नाशिक, मुंबईसह देशातील कोरोना योद्ध्यांना हजारो शुभेच्छापत्र व ऑनलाइन ग्रिटिंग्ज पाठवून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. या अनोख्या संकल्पनेतून पोलिस अधिकारी, आरोग्य कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, घंटागाडी कर्मचारी, विद्युत कर्मचारी आणि दैनिके व माध्यमातील पत्रकारांचे मोबाइल नंबर, त्यांचे मेल आयडी मिळवून त्यांना ही आभारपत्र पाठविण्यात येत आहेत. नाशिकमधील फ्रावशी इंटरनॅशनल शाळेत कला शिक्षिका असलेल्या दर्शना राजपूत यांनी मार्च महिन्यापासून असे कार्ड पाठवण्याचे काम सुरू केले आहे.
चिमुकल्यांची शुभेच्छापत्र देत आहेत लढण्याचे बळ : विश्वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त
पोलिसांचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविलेले या शुभेच्छापत्रांचे आपण प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकार केला आहे. या संकल्पनेमुळे आम्हा पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. या माध्यमातून चिमुकल्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी अतिशय सूक्ष्म विचार करून या युद्धाला अधिक बळ दिले आहे, अशा भावना श्री. नांगरे-पाटील यांनी व्यक्त केल्या.
देशसेवा केल्याची भावना निर्माण होते : दर्शना राजपूत, कला शिक्षका, फ्रावशी इंटरनॅशनल, नाशिक
डॉक्टर, पोलिस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिमुकल्यांमार्फत ई-कार्डस पाठविण्याचे काम आजही सुरू आहे. शुभेच्छापत्र ज्या विद्यार्थ्यांनी ते तयार केले आहे, त्याचे नाव, शाळा, वर्ग नमूद आहे. कोरोनायुद्धात सेवा देणारे कर्मचारी, व्यक्तीचे संपर्क क्रमांक शाळा आणि विविध कार्यालयाकडून मिळविले जातात व त्यांना सकाळी सकाळी वेळी हे ई-कार्ड पाठविले जातात. घरात राहून कंटाळलेल्या मुलांच्या मानसिकतेवर या उपक्रमामुळे निश्चितचं एक चांगला प्रभाव पडला असून त्यांच्या सृजनशिलतेला पुरेपूर वाव मिळण्यास मदत झाली असल्याचे दर्शना राजपूत यांनी सांगितले .
छंद तणावमुक्तीचे योग्य साधन : डॉ. शैलेंद्र गायकवाड, प्रसिद्ध समुपदेशक तथा संमोहनतज्ञ, नाशिक
लहान मुलांचा एक स्थायीभाव असतो. खेळणे, बागडणे, गप्पा मारणे वेगवेगळे छंद जोपासणे त्यांना आवडते. परंतु लॉकडाऊनने त्यांचा भावनिक कोंडमारा होवून मनावरही ताण येवू शकतो. या लहान मुलांमधे निराशेची भावना निर्माण होवू नये यासाठी दर्शना राजपूत यांनी चित्रांच्या विश्वात मुलांना गुंतवले. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चित्रकला अतिशय योग्य साधन आहे.
कोरोनापासून आम्हाला वाचविणाऱ्यांचे आभार : समुद्धी, विद्यार्थींनी
कोरोनापासून आम्हांला वाचविण्यासाठी सेवा देणाऱ्या प्रत्येक घटकाचे आम्ही या ग्रिटिंग्जच्या माध्यमातून ऋण व्यक्त केले आहे. कोरोनाची भीती सगळीकडे असताना देखील आम्हा सगळ्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या सर्व पोलिस, डॉक्टरांचे खूप खूप आभार.
कोरोना सारख्या संकटाशी लढा देताना जे अगदी सर्वस्व पणाला लावून लढताहेत त्यांची उमेद वाढविण्याचे काम या चिमुकल्यांनी देखील केले आहे.
थोडक्यात...
ये तो है सर्दी में धूप की किरणें
उतरें जो आँगन को सुनहरा सा करने
मन के अंधेरों को रोशन सा कर दें
ठिठुरती हथेली की रंगत बदल दें
